भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या गुजरातमधून पक्षाला प्रचंड आर्थिक रसद मिळत असल्याची बाब समोर आली आहे. २०११-१२ ते २०१५-१६ या आर्थिक वर्षांच्या कालावधीत भाजपला अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत ‘चौपट’ दान मिळाले आहे. गुजरात निवडणूक निरीक्षक आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस (एडीआर) या संस्थांकडून सोमवारी याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार २०११ ते २०१५ या पाच वर्षांमध्ये भाजपला २० हजारांवरील रक्कमेच्या २,१८६ देणग्या मिळाल्या. या देणग्यांची एकत्रित रक्कम ८०.४५ कोटी इतकी आहे. तर काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांना एकत्रितपणे केवळ १७.१० कोटी रूपयांच्याच देणग्या मिळाल्या आहेत. भाजपला देशभरातून ८०१.६७५ कोटी रूपयांच्या देणग्या मिळाल्या असून त्या तुलनेत गुजरातमधील देणग्यांचे प्रमाण त्याच्या एक दशांश इतके आहे.
गुजरातमध्ये सर्व राजकीय पक्षांना एकत्रितपणे ९७.५५ कोटी रूपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. यापैकी ८०.४५ कोटी म्हणजे ८२ टक्के रक्कम ही भाजपला मिळाली आहे. तर अन्य पक्षांना मिळालेल्या १७.१० कोटी रूपयांच्या देणग्यांमध्ये १४.०९ कोटी काँग्रेसला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला तीन कोटी तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाला एक कोटी रूपयांची देणगी मिळाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपाने आपल्याला गुजरातमध्ये २० हजारांपेक्षा जास्त रक्कमेची कोणतीही देणगी मिळाली नसल्याचे सांगितले.
गुजरातमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीत दुरावा
याशिवाय, क्षेत्रनिहाय तुलना करायची झाल्यास कॉर्पोरेट आणि उद्योग क्षेत्राकडून सर्वाधिक राजकीय देणग्या देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला देणगी स्वरुपात मिळालेला सर्व निधी कॉर्पोरेट कंपन्यांकडून आला आहे. काँग्रेसचा विचार केल्यास कॉर्पोरेट कंपन्यांकडून आलेल्या देणग्यांचे प्रमाण ९६ टक्के (रु.१३.५७ कोटी) तर भाजपसाठी ८९ टक्के (७१.३५ कोटी) इतके आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला कॉर्पोरेट कंपन्यांकडून देणगी मिळालेली नाही. तर २०१२-१३ या आर्थिक वर्षात राजकीय पक्षांना ४५.३३ कोटी इतक्या रक्कमेच्या सर्वाधिक देणग्या मिळाल्या होत्या.