एडीआरकडून अहवाल जारी : निवडणूक प्रतिज्ञापत्रावर आधारित आकडेवारी
देशातील एकूण 107 खासदार आणि आमदारांच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषण (हेटस्पीच) केल्याच्या आरोपाप्रकरणी गुन्हे नोंद झालेत. मागील 5 वर्षांमध्ये अशाप्रकारच्या आरोपांना तोंड देणाऱ्या 480 उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने (एडीआर) जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. एडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉचने सर्व वर्तमान खासदार तसेच आमदारांसोबत मागील 5 वर्षांमध्ये देशात झालेल्या निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले आहे.
अनेक वर्तमान खासदार आणि आमदारांनी स्वत:च्या विरोधातील ‘द्वेषयुक्त भाषणा’शी संबंधित गुन्ह्यांची माहिती दिली आहे. हे विश्लेषण खासदार अन् आमदारांकडून निवडणूक लढण्यापूर्वी सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांवर आधारित आहे. विश्लेषणानुसार 33 खासदारांनी द्वेषयुक्त भाषणाशी संबंधित गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे. यात 7 खासदार हे उत्तरप्रदेशचे, 4 तामिळनाडूतील, बिहार अन् कर्नाटकमधील प्रत्येकी 3 तर तेलंगणा आणि आसाममधील प्रत्येकी 2 खासदारांचा समावेश आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी दोन तर झारखंड, मध्यप्रदेश, केरळ, ओडिशा आणि पंजाबमधील एका खासदारावर द्वेषयुक्त भाषण केल्याचा आरोप आहे.
मागील 5 वर्षांमध्ये द्वेषयुक्त भाषणाचे आरोप असणाऱ्या 480 उमेदवारांनी विधानसभा, लोकसभा अन् राज्यसभा निवडणूक लढविली आहे. भाजपच्या 22 खासदारांवर द्वेषयुक्त भाषणाशी संबंधित गुन्हे नोंद आहेत. तर काँग्रेसचे दोन, आम आदमी पक्षाच्या एका खासदारावर अशाच प्रकारचा गुन्हा नोंद आहे. एआयएमआयएम, एआययुडीएफ, द्रमुक, अण्णाद्रमुक, पीएमके, शिवसेना (युबीटी) आणि व्हीसीकेच्या प्रत्येकी एका खासदारावर द्वेषयुक्त भाषण केल्याचा आरोप आहे. एका अपक्ष खासदारावरही गुन्हा नोंद आहे.
74 आमदारांनी दिली माहिती
एडीआरनुसार 74 आमदारांनी स्वत:च्या विरोधात नोंद द्वेषयुक्त भाषणाशी संबंधित गुन्ह्यांची माहिती नमूद केली आहे. यातील बिहार तसेच उत्तरप्रदेशातील प्रत्येकी 9, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणातील प्रत्येकी 6 आणि आसाम तसेच तामिळनाडूतील प्रत्येकी 5 आमदारांचा समावेश आहे. दिल्ली, गुजरात आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 4, झारखंड आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी 3, कर्नाटक, पंजाब, राजस्थान आणि त्रिपुरातील प्रत्येकी 2 तर मध्यप्रदेश आणि ओडिशातील प्रत्येकी एका आमदारावर अशा प्रकारचा गुन्हा नोंद आहे.