नागालँड-मिझोरम अन् सिक्कीमच्या एकूण बजेटपेक्षा मोठा आकडा
देशातील 4,001 विद्यमान आमदारांकडे एकूण 54,545 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ईशान्येतील तीन राज्ये नागालँड, मिझोरम आणि सिक्कीमच्या 2023-24 च्या एकूण वार्षिक बजेटपेक्षा (49,103 कोटी रुपये) हा आकडा अधिक आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि नॅशनल इलेक्शन वॉचने मंगळवारी एका अहवालात ही माहिती दिली आहे.
नागालँडचे 2023-24 मधील बजेटचा आकार 23,086 कोटी रुपयांचा तर मिझोरमचा 14,210 कोटी रुपयांचा आहे. तर सिक्कीमचे वार्षिक बजेट 11,807 कोटी रुपयांचे आहे. देशभरातील राज्य विधानसभा आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विद्यमान आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यावर हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
या अहवालात 84 राजकीय पक्षांच्या 4001 आमदार अन् आणि अपक्ष आमदारांना सामील करण्यात आले आहे. यानुसार आमदारांची सरासरी संपत्ती 13.63 कोटी रुपयांची आहे. भाजपच्या 1356 आमदारांची सरासरी संपत्ती 11.97 कोटी रुपयांची आहे. तर काँग्रेसच्या 719 आमदारांची सरासरी संपत्ती 21.97 कोटी रुपयांची आहे.
भाजपच्या 1356 आमदारांची एकूण संपत्ती 16,234 कोटी रुपयांची आहे. तर काँग्रेसच्या 719 आमदारांची एकूण संपत्ती 15,798 कोटी रुपयांची आहे. वायएसआर काँग्रेसच्या 146 आमदारांची एकूण संपत्ती 3379 कोटीची आहे. द्रमुकच्या 131 आमदारांची एकूण संपत्ती 1,663 कोटी रुपयांची तर आम आदमी पक्षाच्या 161 आमदारांची एकूण संपत्ती 1,642 कोटी रुपयांची आहे.
त्रिपुराच्या 59 आमदारांकडे एकूण 90 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर मिझोरमच्या 40 आमदारांची संपत्ती 190 कोटीची आणि मणिपूरच्या 60 आमदारांकडे एकूण 225 कोटी रुपयांची संपत्ती आहे. हा डाटा आमदारांनी मागील निवडणूक लढण्यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या आकड्यावर आधारित आहे