Source: 
ABP Majha
https://marathi.abplive.com/news/politics/according-to-association-for-democratic-reforms-adr-report-15-of-20-ministers-in-maharashtra-face-criminal-cases-1089208
Author: 
एबीपी माझा वेब टीम
Date: 
12.08.2022

ADR Report : महाराष्ट्रातील 75 टक्के मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. खुद्द मंत्र्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात हे जाहीर केलं आहे. ADR च्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे.

ADR Report : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने महाराष्ट्रात तीन दिवसांपूर्वी शपथ घेतलेल्या मंत्र्यांबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 75 टक्के मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे (Criminal Cases) दाखल आहेत. खुद्द मंत्र्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात हे जाहीर केलं आहे.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात नवं सरकार स्थापन झालं. 30 जून रोजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु सरकार स्थापन होऊन महिन्यापेक्षा जास्त काळ उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. अखेर 40 दिवसांनंतर 9 ऑगस्ट रोजी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) पडला. यावेळी शिंदे गटातील 9 आणि भाजपच्या 9 अशा एकूण 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 जणांचं हे मंत्रिमंडळ असेल.

15 मंत्र्यांवर फौजदारी खटले तर सगळे मंत्री कोट्यधीश
महाराष्ट्रातील या मंत्रिमंडळ विस्तारानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने 2019 मधील विधानसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या सर्व मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचं विश्लेषण केलं. या विश्लेषणानुसार, 15 (75 टक्के) मंत्र्यांनी स्वत:वर फौजदारी खटले असल्याचं जाहीर केलं आहे. तर 13 (65 टक्के) मंत्र्यांनी स्वत:वर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे. सर्व मंत्री कोट्यधीश असून त्यांच्या मालमत्तेचे सरासरी मूल्य 47.45 कोटी रुपये आहे.

मंगल प्रभात लोढा सर्वात श्रीमंत मंत्री तर संदीपान भुमरे यांची संपत्ती सर्वात कमी
ADR ने आपल्या अहवालात सांगितलं की, मुंबईतील मलबार हिल मतदारसंघाचे भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा हे सर्वात श्रीमंत मंत्री ठरले आहेत. त्यांनी घोषित केलेली  एकूण संपत्ती  441.65 कोटी रुपये आहे. पैठणमधील शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांची संपत्ती सर्वात कमी आहे. त्यांनी घोषित केलेली एकूण संपत्ती 2.92 कोटी रुपये आहे.

पुरुषप्रधान मंत्रिमंडळ, 8 मंत्री दहावी ते बारावीपर्यंत शिकलेले
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला सदस्यचा समावेश नाही. पुरुष प्रधान मंत्रिमंडळ असा याचा उल्लेख करता होईल. प्रतिज्ञापत्रात मंत्र्यांनी जाहीर केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार 8 (40 टक्के) मंत्री हे इयत्ता दहावी आणि बारावीपर्यंत शिकलेले आहेत. तर 11 मंत्र्यांनी (55 टक्के) पदवी किंवा त्यावरील शैक्षणिक पात्रता जाहीर केली आहे. तसंच एका मंत्र्याकडे डिप्लोमा आहे. याशिवाय चार मंत्र्यांचे वय सरासरी 41 ते 50 वर्षे आहे आणि उर्वरित 16 मंत्र्यांचं सरासरी वय 51 ते 70 वर्षे आहे. 

शिवसेनेत बंड आणि महाविकास आघाडी सरकार पडलं
एकनाथ शिंदे आणि इतर 39 शिवसेना आमदारांनी जूनमध्ये पक्ष नेतृत्वाविरोधात बंड केलं होतं. परिणामी अल्पमतात आलेलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पडलं. विश्वासदर्शक ठरावाला सामोरं न जाता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासह विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. 

© Association for Democratic Reforms
Privacy And Terms Of Use
Donation Payment Method