Source:
प्रहार
https://prahaar.in/amazing-4001-mlas-of-the-country-have-wealth-of-rs-54545-crore/
Date:
02.08.2023
City:
New Delhi
कर्नाटकातील काँग्रेस आमदार आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत आमदार
देशातील सुमारे ४ हजार आमदारांकडे एकूण ५४ हजार ५४५ कोटींची संपत्ती आहे. नागालँड, मिझोराम आणि सिक्कीमच्या २०२३-२४ च्या एकूण बजेटपेक्षा ही रक्कम जास्त आहे. एडीएआर या स्वयंसेवी संस्थेने २८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ४०३३ पैकी ४००१ आमदारांच्या निवडणूकपूर्व शपथपत्रांच्या आधारे संपत्तीचे विश्लेषण करून हा अहवाल तयार केला आहे. यात एका आमदाराची सरासरी मालमत्ता १३.६३ कोटी रुपये आहे.
हे आमदार ८४ राजकीय पक्षांचे असून त्यात अपक्षांचाही समावेश आहे. कर्नाटकातील काँग्रेस आमदार आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे १,४१३ कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत.