Regional Parties Income: असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या स्वयंसेवी संस्थेने मंगळवारी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात 2021-22 या आर्थिक वर्षात प्रादेशिक राजकीय पक्षांनी अज्ञात स्त्रोतांकडून 887.55 कोटी रुपये कमावले, जे राजकीय पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या 76 टक्के आहे.
2020-21 च्या तुलनेत अज्ञात स्त्रोतांकडून राजकीय पक्षांचे उत्पन्न वाढल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 2020-21 मध्ये हे उत्पन्न 530.70 कोटी रुपये होते आणि त्यातील 263.93 कोटी रुपये (49.73 टक्के) अज्ञात स्त्रोतांकडून आले होते.
समोर आलेल्या अहवालानुसार प्रादेशिक पक्षांना इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून सर्वाधिक पैसा मिळाला आहे. हे एकूण रकमेच्या 93.26 टक्के (827.76 कोटी) आहे. 27 प्रादेशिक पक्षांनी कूपनच्या विक्रीतून 4.32 टक्के आणि ऐच्छिक योगदानाद्वारे 2.40 टक्के निधी गोळा केला आहे.
या अभ्यासासाठी, 54 प्रादेशिक (मान्यताप्राप्त) राजकीय पक्षांचा विचार करण्यात आला. परंतु त्यापैकी केवळ 28 जणांनी त्यांचे वार्षिक लेखापरीक्षण आणि देणगी अहवाल सादर केले होते, तर उर्वरित पक्षांनी दोनपैकी केवळ एक अहवाल सादर केला होता.
ADR अहवालानुसार, 20,000 रुपयांपेक्षा जास्त देणग्या हे ज्ञात स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न म्हणून दाखवले गेले आहे कारण त्यांच्या देणगीदारांचे तपशील प्रादेशिक पक्षांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या माहितीमध्ये उपलब्ध आहेत.
20,000 रुपयांपेक्षा कमी देणगी देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था आणि इलेक्टोरल बाँडद्वारे देणगी देणाऱ्या व्यक्तींची नावे राजकीय पक्षांना जाहीर करणे आवश्यक नाही.
अहवालात असे म्हटले आहे की 2021-22 या आर्थिक वर्षात 27 प्रादेशिक राजकीय पक्षांचे एकूण उत्पन्न 1,165.58 कोटी रुपये आहे, तर ज्ञात देणगीदारांकडून राजकीय पक्षांचे एकूण उत्पन्न 145.42 कोटी रुपये आहे, जे त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या 12.48 टक्के आहे.
सदस्यत्व फी, बँक व्याज, प्रकाशनांची विक्री इत्यादीसारख्या इतर ज्ञात स्रोतांमधून राजकीय पक्षांचे एकूण उत्पन्न 132.61 कोटी रुपये किंवा एकूण उत्पन्नाच्या 11.38 टक्के आहे.