देशभरातील राज्य विधानसभा आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विद्यमान आमदारांच्या स्व-शपथ प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यानंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. आमदारांनी त्यांची शेवटची निवडणूक लढवण्यापूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही आकडेवारी काढण्यात आली आहे.
नुकतेच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (D K Shivakumar) हे देशातील सर्वात श्रीमंत आमदार असल्याचे समोर आले होते. आता देशातील एकूण 4,001 विद्यमान आमदारांची मालमत्ता ही तब्बल 54,545 कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे. महत्वाचे म्हणजे हा आकडा नागालँड, मिझोराम आणि सिक्कीम या तीन राज्यांच्या 2023-24 च्या एकत्रित वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा जास्त आहे. या तीनही राज्यांचे एकूण बजेट 49,103 कोटी रुपये आहे. एका अहवालात मंगळवारी ही बाब समोर आली.
यामध्ये नागालँडचे 2023-24 चे वार्षिक बजेट 23,086 कोटी रुपये, मिझोरामचे 14,210 कोटी रुपये आणि सिक्कीमचे 11,807 कोटी रुपये असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि नॅशनल इलेक्शन वॉच (NEW) यांनी हा अहवाल जारी केला आहे.
देशभरातील राज्य विधानसभा आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विद्यमान आमदारांच्या स्व-शपथ प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यानंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. आमदारांनी त्यांची शेवटची निवडणूक लढवण्यापूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही आकडेवारी काढण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, 28 राज्य विधानसभा आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 4,033 पैकी एकूण 4,001 आमदारांचे विश्लेषण केले गेले आहे.
या अहवालात 84 राजकीय पक्षांचे 4001 विद्यमान आमदार आणि अपक्ष आमदारांचा समावेश आहे. दरम्यान, याआधीच्या एका अहवालानुसार, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार हे 1,413 कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत आमदार ठरले आहेत. अपक्ष आमदार आणि उद्योगपती केएच पुट्टास्वामी गौडा 1,267 कोटी रुपयांच्या संपत्तीसह श्रीमंत आमदारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एकूण 1,156 कोटी संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक विधानसभेतील काँग्रेसचे सर्वात तरुण आमदार प्रियकृष्ण आहेत.