एकहाती सत्ता आपल्याच हाती यावी यासाठी सर्वच पक्षांनी 'निवडून येण्याची क्षमता' हाच निकष मानून उमेदवाऱ्या दिल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात तब्बल ३४ टक्के उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यातही २३ टक्के उमेदवारांवर बलात्कार, अपहरण, खंडणीखोरी व दंगली भडकवणे आदी गुन्हे आहेत. विशेष म्हणजे ४११९पैकी २३३६ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातील माहितीच्या आधारेच काही संस्थाच्या सर्वेक्षणातून हे निष्कर्ष पुढे आले आहेत.
अग्नि संस्थेचे अध्यक्ष द. म. सुकथनकर, महाराष्ट्र इलेक्शन वॉचचे शरद कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेच उमेदवारांचे प्रगतिपुस्तक मांडले. दोन किंवा त्याहून अधिक काळ शिक्षा झालेल्यांना निवडणूक लढवण्यास सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी बंदी घातली होती. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार न देण्याची सर्वच पक्षांची भूमिका होती. मात्र, ऐनवेळी आघाडी आणि युती तुटल्याने जिंकून येऊ शकणाऱ्या उमेदवारालाच तिकीट देण्यात आले आहे.
सेना प्रथम, काँग्रेस शेवटी!
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांचे प्रमाणात शिवसेनेत सर्वाधिक म्हणजे ६१ टक्के असून त्याखालोखाल मनसेचा (५४ टक्के) क्रम आहे. शिवछत्रपतींचे नाव घेणाऱ्या तत्त्वनिष्ठ भाजपचे ५३ टक्के उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, राष्ट्रवादीने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ४३ टक्के तर काँग्रेसने ३३ टक्के उमेदवारांना तिकीट दिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
Source
Loksatta
http://www.loksatta.com/vidhansabha/34-percent-candidates-criminal-background-in-maharashtra-assembly-1030404/
Date
City
Mumbai