MPs criminal records : देशातील खासदारांबद्दलची माहिती समोर आलीये. यात कोणत्या राज्यातील किती खासदारांवर फौजदारी गुन्हे आहेत. त्याचबरोबर कोणत्या खासदारांकडे किती संपत्ती आहे, याबद्दल माहिती आहे.
MPs Criminal Cases Marathi : देशातील सुमारे 40 टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी 25 टक्के खासदारांवर गंभीर कलमांखाली खटले सुरू आहेत. या खासदारांवर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांविरोधातील गुन्हे दाखल आहेत. त्याबरोबर दोन्ही सभागृहात केरळमधील 29 खासदारांपैकी 23 (79 टक्के) खासदारांवर गुन्हेगारीचे आरोप आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि असोसिएशन नॅशनल इलेक्टोरल वॉच (न्यू) यांच्या ताज्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे, जे निवडणुकीशी संबंधित डेटाचे विश्लेषण करते. (Know which state’s MPs have the highest number of criminal cases against them).\
एडीआरचे म्हणणे आहे की, देशभरातील लोकसभा आणि राज्यसभेच्या 776 जागांपैकी 763 विद्यमान खासदारांच्या शपथपत्रांचे विश्लेषण करून माहिती काढण्यात आली आहे. मागील निवडणुका आणि त्यानंतरच्या पोटनिवडणुका लढवण्यापूर्वी खासदारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती घेण्यात आली आहे, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.
लोकसभेच्या चार आणि राज्यसभेची एक जागा रिक्त आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये राज्यसभेच्या चार जागा रिक्त आहेत. तेथे विधानसभा न झाल्यामुळे जागा रिक्त आहे.
त्याचवेळी, कागदपत्रे उपलब्ध न झाल्यामुळे एका लोकसभा खासदार आणि तीन राज्यसभेच्या खासदारांच्या शपथपत्रांचे विश्लेषण होऊ शकले नाही. विश्लेषण केलेल्या 763 विद्यमान खासदारांपैकी 306 (40 टक्के) लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. तर 194 (25 टक्के) विद्यमान खासदारांनी गंभीर गुन्हेगारी प्रकरणे घोषित केली आहेत, ज्यात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे.
बिहारमधील 73 टक्के खासदारांवर गुन्हेगारीचे आरोप
केरळमध्ये सर्वाधिक खासदार गुन्हेगारी प्रकरणात आरोपी आढळले आहेत. दोन्ही सभागृहातील सदस्यांपैकी केरळमधील 29 खासदारांपैकी 23 (79 टक्के) विरोधात गुन्हे दाखल आहेत. बिहारमधील 56 पैकी 41 खासदार (73 टक्के), महाराष्ट्रातील 65 पैकी 37 खासदार, तेलंगणातील 24 पैकी 13 खासदार (50 टक्के) आणि दिल्लीतील 10 पैकी 5 खासदारांनी (50 टक्के) प्रतिज्ञापत्रात स्वत:वरील गुन्ह्यांची माहिती दिलीये.
उत्तर प्रदेशातील 34 टक्के खासदारांवर गंभीर गुन्हे
महत्त्वाचा मुद्दा असा की, गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत बिहारचे खासदार आघाडीवर आहेत. बिहारमधील 56 पैकी 28 खासदार (50 टक्के), तेलंगणातील 24 पैकी 9 खासदार (38 टक्के), केरळमधून 29 पैकी 10 खासदार (34 टक्के), महाराष्ट्रातील 65 पैकी 22 खासदार आणि उत्तर प्रदेशमधील 108 पैकी 37 (34 टक्के) खासदारांनी त्यांच्या शपथपत्रात गंभीर गुन्हेगारी प्रकरणे जाहीर केली आहेत.
काँग्रेसच्या 53 टक्के खासदारांवर खटले
भाजपचे 385 पैकी सुमारे 139 खासदार (36 टक्के), काँग्रेसचे 81 पैकी 43 खासदार (53 टक्के), टीएमसीचे 36 पैकी 14 खासदार (39 टक्के), आरजेडीच्या 6 पैकी 5 खासदार (83 टक्के), सीपीआयचे 6 पैकी 5 खासदार, आम आदमी पार्टीचे 11 पैकी 3 खासदार (27 टक्के), YSRCP चे 31 पैकी 13 खासदार (42 टक्के) आणि NCP चे 8 पैकी 3 खासदारांनी (38) टक्के) प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील गुन्ह्याची माहिती दिलीये.
आरजेडीच्या 50 टक्के खासदारांवर गंभीर गुन्हे
भाजपच्या 385 पैकी सुमारे 98 (25 टक्के), काँग्रेसच्या 81 पैकी 26 (32 टक्के), टीएमसीच्या 36 पैकी 7 (19 टक्के), राजदच्या 6 पैकी 3 (50 टक्के), CPI (एम) चे 8 पैकी 2 खासदार (25 टक्के), आपचे 11 पैकी 1 खासदार (9 टक्के), वायएसआरसीपीचे 31 पैकी 11 खासदार (35 टक्के) आणि राष्ट्रवादीचे 8 पैकी 2 खासदार (25 टक्के) टक्के) यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात गंभीर गुन्ह्यांची माहिती दिलीये.
21 खासदारांवर महिला अत्याचाराचे आरोप
11 विद्यमान खासदारांनी खुनाशी (भारतीय दंड संहितेचे कलम 302) संबंधित गुन्ह्यांची घोषणा केलेली आहे. 32 विद्यमान खासदारांनी हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याची (IPC कलम 307) माहिती दिली. तर 21 विद्यमान खासदारांवर महिलांवरील गुन्ह्यांचे गुन्हे दाखल आहेत. या 21 खासदारांपैकी चार खासदारांनी बलात्काराशी संबंधित गुन्हे (IPC चे कलम 376) घोषित केले आहेत.
तेलंगणातील सर्वात श्रीमंत खासदार
एनडीआरने असेही उघड केले की लोकसभा आणि राज्यसभा खासदारांकडे सरासरी 38.33 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर 53 (सात टक्के) खासदार अब्जाधीश आहेत. एकूण खासदारांच्या हे प्रमाण सात टक्के आहे. यामध्ये तेलंगणाचे खासदार सर्वात श्रीमंत आहेत. तेलंगणातील 24 खासदारांची सरासरी संपत्ती 262.26 कोटी रुपये आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशातील 36 खासदारांची सरासरी संपत्ती 150.76 कोटी रुपये आहे. पंजाबच्या 20 खासदारांची सरासरी संपत्ती 88.94 कोटी रुपये आहे.
लक्षद्वीपच्या खासदारांकडे सर्वात कमी संपत्ती
खासदारांची सर्वात कमी सरासरी संपत्ती असलेले राज्य लक्षद्वीप (1 MP) आहे. तेथील सरासरी मालमत्ता 9.38 लाख रुपये आहे. त्यानंतर त्रिपुरातील 3 खासदारांची सरासरी संपत्ती 1.09 कोटी रुपये आहे. मणिपूरच्या 3 खासदारांची सरासरी संपत्ती 1.12 कोटी रुपये आहे.
भाजप खासदारांची सरासरी संपत्ती 18.31 कोटी
प्रमुख पक्षांच्या खासदारांचेही त्यांच्या संपत्तीचे विश्लेषण करण्यात आले. भाजपच्या 385 खासदारांची सरासरी संपत्ती 18.31 कोटी रुपये आहे. काँग्रेसच्या 81 खासदारांची सरासरी संपत्ती 39.12 कोटी रुपये आहे. 36 टीएमसी खासदारांची सरासरी मालमत्ता 8.72 कोटी रुपये आहे. YSRCP च्या 31 खासदारांची सरासरी मालमत्ता 153.76 कोटी रुपये आहे. टीआरएसच्या 16 खासदारांची सरासरी संपत्ती 383.51 कोटी रुपये आहे. राष्ट्रवादीच्या 8 खासदारांची सरासरी संपत्ती 30.11 कोटी रुपये आहे. ‘आप’च्या 11 खासदारांची सरासरी संपत्ती 119.84 कोटी रुपये आहे.
या राज्यांतील अब्जाधीश खासदार
53 खासदार अब्जाधीश असल्याचे समोर आले आहे. यामध्ये तेलंगणातील 24 पैकी 7 खासदार (29 टक्के), आंध्र प्रदेशातील 36 पैकी 9 खासदार (25 टक्के), दिल्लीतील 10 पैकी 2 खासदार (20 टक्के), पंजाबमधील 20 पैकी 4 खासदार (20 टक्के), उत्तराखंड. 8 पैकी 1 खासदार (13 टक्के), महाराष्ट्रातील 65 पैकी 6 खासदार (9 टक्के), कर्नाटकातील 39 पैकी 3 खासदारांनी (8 टक्के) 100 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जाहीर केली आहे.
भाजपचे 4 टक्के खासदार अब्जाधीश
385 पैकी सुमारे 14 भाजप खासदार (4 टक्के), 81 पैकी 6 काँग्रेस खासदार (7 टक्के), 16 पैकी 7 TRS खासदार (44 टक्के), 31 पैकी 7 YSRCP खासदार (23 टक्के), AAP 11 पैकी 3 एसएडी खासदार (27 टक्के), 2 पैकी 2 एसएडी खासदार (100 टक्के) आणि 36 पैकी 1 AITC खासदार (3 टक्के) यांनी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती जाहीर केली आहे. 763 विद्यमान खासदारांची एकूण संपत्ती 29,251 कोटी रुपये आहे.
भाजप खासदारांकडे 7051 कोटींची संपत्ती
भाजपच्या 385 खासदारांची एकूण संपत्ती 7,051 कोटी रुपये आहे. टीआरएसच्या 16 खासदारांची एकूण संपत्ती 6,136 कोटी रुपये, वायएसआरसीपीच्या 31 खासदारांकडे 4,766 कोटी रुपये, काँग्रेसच्या 81 खासदारांकडे 3,169 कोटी रुपये आणि आपच्या 11 खासदारांकडे 1,318 कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे.